
राजुरा उपविभागात आठ ग्रामस्थांना ठार मारणाऱ्या आरटी – 1 वाघास अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. मागील आठ महिन्यांपासून वनविभाग या नरभक्षक वाघाच्या शोधात होते. आज विरूर येथे एका रेल्वे पुलाच्या खाली तयार केलेल्या कृत्रिम लोखंडी पिंजऱ्यात हा वाघ अडकल्याचं वनविभागाला कळलं. सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाघाला बेशुद्ध करत पिंजऱ्यात बंद केले.
जंगलात किंवा जंगलशेजारी कामासाठी गेलेल्या लोकांवर या वाघाने आजपर्यंत हल्ले केले आहेत. या भागातील अनेक गावातील शेती जंगलालगत आहे. आता पीक काढणीचे दिवस असल्याने शेतकरी-शेतमजूर कामावर जाऊ लागले. अशात या वाघाची भीती निर्माण झाल्याने शेतीची कामेही प्रभावित झाली होती. त्यामुळे या वाघाला तातडीनं पकडा किंवा मारा, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.
या परिसरामध्ये आतापर्यंत आठ जणांना या वाघाने ठार केले आहे. या वाघाची दहशत लक्षात घेता त्याला पकडण्याचे आणि प्रसंगी मारण्याचे आदेश ऑगस्टमध्येच देण्यात आले होते. तेव्हापासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. आज अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.




























































