चंद्रपूर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र (बफर झोन) खडसंगी निमढेला उपक्षेत्रातील जंगलालगतचा भाग आणि गावात धुमाकूळ घालून तिघांचा बळी घेणाऱ्या भानुसखिंडी वाघिणीच्या बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश मिळाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
वाघाच्या हल्ल्यात सूर्यभान कटु हजारे, रामभाऊ रामचंद्र हनवते आणि अंकुश श्रावण खोब्रागडे या नागरिकांचा मृत्यू झाला. नरबळी घेणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने गेल्या दोन दिवसांपासून निमढेला भागात शोधकार्य सुरू केले होते. अखेर कक्ष क्र.59मध्ये वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर वाघाची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा येथे करण्यात आली.
दरम्यान, खडसंगी बफर क्षेत्रातील पर्यटकांना भानुसखिंडी व तिच्या बछड्याचे सहज दर्शन होत होते. त्यामुळे अनेक पर्यटकांना तिचा लळा लागला होता. तर दुसरीकडे भानुसखिंडीच्या दुसऱ्या बछड्याने मागील सात महिन्यांत तीन जणांचा बळी घेतल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.