वाघाच्या भीतीने वनविभागाने शहरात फिरवली दवंडी

1084

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत आजवर केवळ जंगलातील गावांतच होती. मात्र आता ही दहशत चंद्रपूर शहरात निर्माण झाली असून, लोकांनी सतर्कता बाळगावी, यासाठी वनविभाग चक्क दवंडी देत आहे.

चंद्रपूर जिल्हा हा जंगलाने व्यापलेला जिल्हा. त्यातच ताडोबा व्याघ्र प्रकल्प. पट्टेदार वाघांसाठी उपयुक्त असे वातावरण असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली. आता त्यांना जंगल कमी पडू लागल्याने वाघ बाहेर पडू लागले. हे वाघ आता बाहेर पडून वीज केंद्र परिसर आणि चंद्रपूर शहराच्या सीमेवर आले आहेत. शहरातील इरई नदी, लखमापूर परिसरात दिसू लागलेत. आजवर जंगलात असणारे प्राणी आता गावात दिसू लागल्यानं नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, रात्री बाहेर पडणंही कठीण झालं आहे.

नागरिकांमधील ही भीती दूर व्हावी आणि वन्यजीव किंवा मानवास कोणतीही इजा होऊ नये, यासाठी वनविभाग जनजागृती करीत आहे. शहराच्या ज्या भागात वाघाचे दर्शन झाले, त्या भागात दवंडी दिली जात आहे. चक्क शहरात अशी दहशत निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एरव्ही बिबट्यांची घुसखोरी अनेक ठिकाणी आपण बघितली. मात्र पट्टेदार वाघाने शहरात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे वनविभागाचे एक पथकही या भागात सतत देखरेख ठेवून आहे.

आपली प्रतिक्रिया द्या