चंद्रपूरच्या 12 वी पास तरुणाने समाजापुढे ठेवला आदर्श; पर्यावरण रक्षणाचे घेतले व्रत, कार्याचे सर्वत्र कौतुक

पर्यावरण रक्षण व संवर्धनाची जबाबदारी ज्या शासकीय यंत्रणांच्या खांद्यावर असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना मूल शहरातील बारावी पर्यंत शिक्षण घेतलेला युवक मागील सहा वर्षांपासून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कार्य करून शासन, प्रशासन व समाजापुढे आदर्श ठेवत असल्याने या युवकाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे हे कार्य पर्यावरणाच्या अधोगतीस कारणीभूत ठरलेल्या व्यवस्थेकरीता एक प्रकारे दीपस्तंभ ठरले आहे. समाजसेवेची आवड आणि संस्काराची शिदोरी असली की, आपल्या हातून सत्कार्य निश्चितपणे घडते. त्यासाठी वेगळ्या प्रशिक्षणाची गरज पडत नाही, हे बारावी शिकलेल्या गौरव श्यामकुळे या ग्रामीण युवकाने कृतीतून दाखवून दिले.

गौरव श्यामकुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात सोमनाथ या छोट्याशा गावी त्याचा जन्म झाला. याच ठिकाणी कर्मयोगी बाबा आमटे यांचे आश्रम आहे. या आश्रमात कुष्ठरुग्णांची सेवा घडते. समाजापासून तुटलेला हा घटक बाबांच्या सेवाकार्याने सन्मानाने जगत आहे. बाबांच्या या महान कार्याला बघत बघत श्यामकुळे लहानाचा मोठा झाला. या आश्रमाचा तो एक घटक झाला. बाबांच्या कार्याचे सुसंस्कार त्याच्यावर होत गेले आणि तसा तो घडत गेला. बाबांच्या याच कार्यापासून प्रेरणा घेत आपणही समाजासाठी काही केले पाहिजे, असा विचार त्याच्या मनात घोंगावू लागला. समाजाने टाकून दिलेल्या कुष्ठरुग्नांना बाबांनी जसा आत्मसन्मान दिला, तसेच कार्य आपणही करावे, या विचारातून त्याने 2018 पासून कचरा संकलनाचे काम हाती घेतले. सोमनाथ ही बाबांची कर्मभूमी असल्याने देशविदेशातून हजारो पर्यटक बाबांच्या आश्रमाला भेट देतात. या पर्यटकांमुळे आणि गावातील अनास्थेवाईक लोकांमुळे जो कचरा ठिकठिकाणी फेकला जातो, त्याचे संकलन हा युवक करू लागला. दारू, बियरच्या बाटल्या असतील, प्लास्टिक असेल अशा सर्व प्रकारचा कचरा गोळा करून तो त्याची विल्हेवाट लावतो आणि परिसर स्वच्छ ठेवतो.

आज त्याच्या कार्याला सहा वर्षे झाली. मागील सहा वर्षा पासून रोज सकाळी दोन तास पर्यावरण वाचविण्यासाठी तो अविरत या कार्यात मग्न आहे. समाजाने केलेली घाण नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करतोय. तो आता स्वच्छतादूत ठरलाय. पण याचा कुठेही गवगवा नाही की कुठे मिरवण्याचा हव्यास नाही. त्याचे हे कार्य बघून आता गावातील काही युवक त्याला स्वतःहून जुळले. कुणीतरी आपण केलेला कचरा उचलायला येणार, म्हणून जागोजागी कचरा करणाऱ्या लोकांनीच आता स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपली धरती, जंगलं, पाणी, पर्यावरण निकोप राहील, असे त्याला वाटते.