विषारी वायुगळतीने मृत्युमुखी पडलेल्या 31 माकडे, 14 कबुतरांना परस्पर गाडले

520

चंद्रयान- 2 मुळे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात इस्रोचे कौतुक होत असताना रायगड जिह्यातील रसायनीमध्ये गेल्या वर्षी झालेल्या वायुगळतीप्रकरणी इस्रोच्या पाच अभियंत्यांसह 10 कर्मचाऱ्यांवर वनविभागाने आरोपपत्र दाखल केले आहे. वायुगळतीमध्ये 31 माकडे आणि 14 कबुतरांचा बळी गेला होता. त्याची कुठेही कानोकान खबर होऊ नये यासाठी इस्रोच्या ताब्यात असलेल्या ‘हिदुस्थान ऑरगॅनिक लिमिटेड’ कंपनीच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जमिनीत दफन केले होते, असे या आरोपपत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे इस्रो व्यवस्थापनाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

रसायनी येथील ‘हिदुस्थान ऑरगॅनिक लिमिटेड‘ अर्थात एचओसी हा प्रकल्प इस्रोचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. अनेक महिने बंद असलेला हा प्रकल्प डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाला. पण तांत्रिक कारणाने 13 डिसेंबरला वायुगळती होऊन माकडे, कबुतरे मृत्युमुखी पडली होती. या गोष्टीची वाच्छता होऊ नये म्हणून कंपनीत कार्यरत असलेले इस्रोचे अभियंते राजेंद्र सुर्ते, गौतम मराठे, संजय दीक्षित, अनिल शिगवण यांनी आवारात जमीन खोदून माकडे आणि कबुतरे सकाळी जमिनीत पुरली. पण स्थानिक पंत्राटी कामगारांनी तीन दिवसांनी याबाबतची माहिती प्राणीमित्र संघटनांना दिली आणि हे प्रकरण उघडकीस आले. प्राणीमित्र संघटनांनी आवाज उठवल्यानंतर वनखात्याने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी 31 माकडे आणि 14 कबुतरे मृत आढळून आली.

दोषींवर कारवाई होणार

सुरुवातीला केवळ पंत्राटी कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र दबाव वाढताच वनविभागाने इस्रोच्या अभियंत्यांवर व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. पनवेल सत्र न्यायालयात याप्रकरणी 21 जूनला आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र त्याची कारवाई अद्यापि सुरू होऊ शकली नाही. याचदरम्यान कंपनीचे व्यवस्थापक एस. बी. भिडे यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली.

आपली प्रतिक्रिया द्या