चांदवड, सिन्नरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकच्या चांदवड व सिन्नर तालुक्यात शनिवारी पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील गणुर येथील सुनील राधोजी पगार (45) हे बाजीराव शिंदे यांच्या शेतात शनिवारी कांद्याची रोपे पाहायला आले होते. विहिरीच्या कठडय़ावर बसले असताना तोल जाऊन पडल्याने बुडाले. इतर शेतकऱयांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. विनोद गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीवरून चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

दुसरी घटना सिन्नर तालुक्यातील मापारवाडी येथे सकाळी घडली. मूळ तेलंगणा राज्यातील योगेश यादवराव सांडगे (22) हा मजुरी कामानिमित्त मापारवाडी येथे आला होता. तेथील काळे मळ्यातील तळ्यावर आंघोळीसाठी गेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. इतरांनी त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी सिन्नर नगरपालिका रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केल्याची माहिती सिन्नर पोलिसांनी दिली.