
उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री हे चारधाम यात्रांचे कपाट बंद करण्याची तारीख अखेर ठरवण्यात आली आहे. विजयादशमी रोजी पंचांग गणना केल्यानंतर या धामांचे कपाट बंद करण्याचा शुभ मुहूर्त काढण्यात आला असून 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व कपाट बंद केले जाणार आहेत. त्याआधी रितीरिवाजाप्रमाणे सर्व पूजा-अर्चा केली जाणार आहे. चार धाम यात्रा करण्यासाठी आता भाविकांना केवळ दीड महिना उरला आहे.
गंगोत्री धामचे कपाट 22 ऑक्टोबरला अन्नकुट पर्वाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 11.36 वाजता बंद केले जातील. यमुनोत्री धामचे कपाट 23 ऑक्टोबरला दुपारी साडे बारा वाजता भाविकांसाठी बंद केले जातील. कपाट बंद करण्यात आल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी यमुनेचे दर्शन खरसाली गावात होईल. कपाट बंद होण्याआधी सकाळी मां यमुनेचे बंधू शनिदेव महाराजाची पालखी आपल्या बहिणीला आणण्यासाठी यमुनोत्री धामसाठी रवाना होईल. केदारनाथ धाम 23 ऑक्टोबरला भाऊबीजेच्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता बंद केले जातील. तर बद्रीनाथ धामचे कपाट 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजून 56 मिनिटांनी बंद केले जातील. कपाट बंद होण्याऐवजी पंच पूजा 21 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
कोणते धाम कधी बंद होणार?
- गंगोत्री धाम ः 22 ऑक्टोबर
- यमुनोत्री धाम ः 23 ऑक्टोबर
- केदारनाथ धाम ः 23 ऑक्टोबर
- बद्रीनाथ धाम ः 25 नोव्हेंबर
- बद्रीनाथ धाममध्ये 14,20,357 भाविकांनी दर्शन केले. केदारनाथ धाममध्ये 16,02,420 भाविकांनी दर्शन घेतले. या दोन्ही धामांचे एकूण 30 लाखांहून अधिक भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले आहे.