चारधाम यात्रेत आतापर्यंत 11 भाविकांचा मृत्यू, प्रचंड गर्दीमुळे ऑफलाईन रजिस्ट्रेशन केले बंद

गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथसह चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात होऊन पाच दिवस उलटले असून लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. मात्र आतापर्यंत या यात्रेसाठी आलेल्या 11 भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात्रा सुरु झाल्याने येथे प्रचंड गर्दी झाल्याने आता ऑफलाईन रजिस्ट्रेशनही बंद करण्यात आले आहे.

चारधाम यात्रा सुरु झाल्याने लाखओ भाविक दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. भाविकांची प्रचंड गर्दी पाहता 15 आणि 16 मे रोजी ऑफलाईन रजिस्ट्रेशन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता चारधाम यात्राचे रजिस्ट्रेशन हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये केले जात आहेत. एका पत्रकार परिषदेत गढवाल आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, 15 एप्रिलपासून आतापर्यंत 26 लाख 73 हजार 519 रजिस्ट्रेशन झाले होते. गंगोत्री येथे 4 लाख 21 हजार 366 रजिस्टच्रेशन तर यमुनोत्री येथे 4 लाख 78 हजार 576, तर हेमकुंड साहिब साठी आतापर्यंत 59 हजारहून अधिक लोकांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. ऋषिकेशमध्ये आतापर्यंत 76 हजार 120 नोंदणी ऑफलाइनद्वारे करण्यात आली आहे. हरिद्वारमध्ये ऑफलाइनद्वारे 66 हजार 251 नोंदणी करण्यात आली आहे. 59 हजारांहून अधिक भाविकांनी यमनोत्रीचे दर्शन घेतले आहे. 51 हजारांहून अधिक भाविकांनी गंगोत्रीचे दर्शन घेतले आहे. 1 लाख 26 हजार 306 भाविकांनी केदारनाथचे दर्शन घेतले आहे. 39 हजार 574 भाविकांनी बद्रीनाथचे दर्शन घेतले आहे.

चार धाम यात्रेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सचिव मीनाक्षी सुंदरम बुधवारी उत्तरकाशीमध्ये पाहणी करणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि क्षमतेनुसार प्रवाशांना थांबवले जात आहे. त्यांच्यासाठी प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे गढवाल आयुक्तांनी सांगितले. गेल्या वर्षी चारधाम यात्रेदरम्यान सुमारे 200 भाविकांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी यात्रा संपल्यानंतर सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केदारनाथमध्ये 96, यमुनोत्री धाममध्ये 34, गंगोत्री धाममध्ये 29, बद्रीनाथ धाममध्ये 33, हेमकुंड साहिबमध्ये 7 आणि गायमुख ट्रेकमध्ये 1 मृत्यू झाला होता. तर 2022 मध्ये चारधाम यात्रेदरम्यान 232 भाविकांचा मृत्यू झाला होता. केदारनाथ धाममध्ये 111, बद्रीनाथ धाममध्ये 58, हेमकुंड साहिबमध्ये 4, गंगोत्रीमध्ये 15 आणि यमुनोत्री धाममध्ये 44 जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी 2021 मध्ये एकूण 300 भाविकांचा मृत्यू झाला होता.