मास्क कारवाईच्या नावाखाली मोबाईल लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्क कारवाईच्या नावाखाली तरुणाचा मोबाईल लांबवल्याची घटना चारकोप येथे घडली. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे मालवणी येथे राहत असून ते कडिया काम करतात. चार दिवसांपूर्वी ते चारकोप येथे गेले होते. सायंकाळी ते काम संपवून घरी जाते होते. चारकोपच्या एम. जी. रोड येथील झुणका-भाकर केंद्राजवळ येताच त्यांना थांबवण्यात आले. आपण पालिकेचे अधिकारी असून तोंडावरचा मास्क खाली केल्याने एक हजार रुपये दंड भरावा लागेल असे त्यांना सांगण्यात आले. दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याचे तरुणाने त्या ठगाला सांगितले. दंडाची रक्कम न दिल्यास पोलिसांकडे देऊ असे सांगून ठगाने तरुणाचा मोबाईल घेतला. त्यानंतर दोनजण मोटरसायकलवर बसून भाबरेकर नगरच्या दिशेने निघून गेले. घडल्याप्रकरणी तरुणाने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्या दोन ठगांचा शोध घेत आहेत.