विमानतळावर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणारा अटकेत 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणाऱया तरुणाला सहार पोलिसांनी गोवंडी येथून अटक केली. त्याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

गेल्या काही दिवसापासून मुंबईत बॉम्बस्पह्टाच्या धमकीचे खोटे फोन येत असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. सोमवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लॅण्डलाईनवर फोन आला. फोन करणाऱयाने त्याचे नाव सांगून तो इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सतत उल्लेख करत होता. तसेच संशयास्पद कोड भाषेत तो बोलत होता. कर्मचाऱयाने याची माहिती विमानतळ अधिकाऱयांना दिली. त्यानंतर विमानतळ अधिकाऱयाने सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ-8 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासासाठी  पोलिसांचे एक पथक तयार केले. फोन करणारा हा गोवंडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी एका तरुणाला गोवंडी येथून ताब्यात घेऊन अटक केली.