चौथऱयाच्या सुशोभीकरणामुळे शनिभक्तांचे दर्शन सुखकर होणार; उद्योगपती शनिभक्ताकडून 60 लाखांची देणगी

>> नवनाथ कुसळकर

शनिशिंगणापुरात पाचशे वर्षांच्या कालखंडापासून शनीची स्वयंभू मूर्ती चौथऱयावर विराजमान आहे. देवस्थान विश्वस्त समितीने चौथरा दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले असून, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी पुणे येथील एका उद्योगपती शनिभक्ताने 60 लाख मोजले आहेत. कृष्णशिला काळा ग्रॅनाईट नक्षीदार कोरीव काम असलेले दगड तामिळनाडूमधून मंदिर परिसरात दाखल झाले. सदरच्या चौथरा बांधकामामुळे येथील रूपडे पालटून शनिभक्तांचे दर्शन सुखकर होणार आहे.

शनी महाराजांचा चौथरा आकर्षक असावा यासाठी पुणे येथील एका भक्ताने स्वखर्चाने चौथरा बांधून देण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यासाठी देवस्थानने परवानगी दिली. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कर्नाटकातील व तामिळनाडू खाणीत ग्रॅनाईट दगड घडवण्याचे काम सुरू होते. त्यावर नक्षीदार कोरीव काम केले गेले. सदरचे नक्षीदार दगड शनी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.

मूळ चौथऱयाच्या चारही बाजूने खोदाई काम सुरू असून, सध्याचा 18 बाय 18 असणाऱया चौथऱयाचा आकार आता 21 बाय 21 आकारात केला जाणार आहे. तीन फूट उंच व सोळा इंच रुंदी असलेले ग्रॅनाईट दगड तसेच पितळी ओतीव कामात संरक्षक कठडे, त्याच दगडात दोन्ही बाजूस पायऱया आणि चौथऱयाच्या जागेवर शिल्पकला करण्यात येणार आहे.

नगर जिह्यातील शनिशिंगणापुरात महाराष्ट्रासह देशभरातून भाविक शनी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. दिवसेंदिवस वाढती गर्दी लक्षात घेता येथे भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होताना दिसत असून भाविक या निमित्ताने समाधान व्यक्त करत आहेत. चौथऱयाचे रूप पालटणार असल्याने भाविकांच्या गर्दीत वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास देवस्थान विश्वस्तांनी व्यक्त केला. चौथरा दुरुस्ती कामी गोवा येथील आर्किटेक्ट अभिजित साधले हे करणार असून, या शिल्पकला कामाचे ठेकेदार विवेक हे हुबळी येथील आहेत.

पानसतीर्थ वैभवात भर

– पानसनाला येथे शनी महाराजांची मूर्ती पुराच्या पाण्यात वाहून आली. मंदिराच्या पूर्वेला असलेला तो पानसनाला परिसर आज पानसतीर्थ प्रकल्प म्हणून साकारला आहे. नव्याने सुरू झालेला महाद्वार, दर्शनरांग, घाट तसेच भुयारी मार्ग, मोठय़ा उंचीची दीपमाळ, बागबगीचा असा दिव्य स्वरूपात प्रकल्प उभारल्याने भाविकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

शनी महाराजांच्या चौथऱयाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत तीन ते चार वेळा चौथरा दुरुस्ती काम झाले आहे. मात्र, दानशूर भक्ताने दिलेल्या दानातून सुसज्ज मजबूत चौथरा येत्या दोन महिन्यांत तयार होईल.

– भागवत बानकर,

अध्यक्ष शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर