
न्यूझीलंडमधील नामांकित हॉस्पिटलचा डॉक्टर, उच्च शिक्षित अशा प्रकारचा मॅट्रोमोनियल साईटवर चकित करणारा प्रोफाईल बनवून त्याआधारे दिल्लीत बसून महिलांची आर्थिक फसवणूक करणारा आयव्हरी कोस्टचा भामटा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्या भामटय़ाने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
कुर्ल्यात राहणारी सईदा (नाव बदलेले, 34) हिची जुलै महिन्यात मॅट्रिमोनियल साईटवर डॉक्टर अहमद शेख याच्याशी मैत्री झाली. तेव्हा न्यूझिलंड येथील मर्सी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याचे अहमद शेखने सईदाला सांगितले. मग अहमदने तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान, 10 जुलै रोजी त्याने वाढदिवस असल्याचे सांगून सईदाला खास गिफ्ट पाठविल्याचे सांगितले.
एका कुरियर कंपनीतून सतत फोन करून कुरियर आल्याचे सईदाला सांगण्यात आले. मग वेगवेगळ्या फीच्या नावाखाली सईदाकडून 20 लाख 65 हजार रुपये विविध बँक खात्यात भरण्यास सांगितले. त्यानुसार सईदाने पैसे भरले. पैसे मिळताच अहदमने तिला टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच सईदाने विनोबा भावे पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक राजेश पवार व पोलीस निरीक्षक रढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच मनोज राजे, अजय बोटे, आनंद पवार, शंकर दगडे, विनोद पवार या पथकाने तपास सुरु केला.
दिल्लीत बसून फसवत होता
पथकाने सईदाने पैसे भरलेल्या बँक खाती तसेच तांत्रिक बांबीचा अभ्यास केला असता न्यूझीलंडचा डॉक्टर असल्याचे सांगणारा भामटा दिल्लीत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार सपकाळे, पवार व पथकाने दिल्लीत जाऊन अमोन ओकऑनक्वो डेव्हिड (28) या आयव्हरी कोस्टचा रहिवासी असलेल्या भामटय़ाला पकडून आणले. अमोनने पेटीएम, विविध बँक खात्यांचा वापर केला असून बोगस कागदपत्रांच्या आधारे सीम कार्ड घेतले होते.























































