वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात सुनेला जामीन; पोलिसांना झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर येथील वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या तिच्या सूनबाईला उच्च न्यायालयाने दोन वर्षांनंतर सशर्त जामीन मंजूर केला आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका दिला. पोलिसांनी तिच्याविरुद्ध सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांमध्ये प्रथमदर्शनी विसंगती दिसून येत आहे. वास्तविक, आरोपीच्या दोषत्वाचा निष्कर्ष काढताना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळीत कुठलेही अंतर असता कामा नये, ते पुरावे साखळीच्या रूपात घट्ट बांधलेले असावेत, पोलिसांनी निदर्शनास आणलेल्या गुह्याच्या परिस्थितीचे स्वरूप निर्णायक असलेच पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण निरीक्षणेही न्यायालयाने या प्रकरणात नोंदवली आहेत.

दोन वर्षांपूर्वी 70 वर्षीय संजना पाटील या वृद्धेची हत्या केल्याच्या आरोपाखाली टिळक नगर पोलिसांनी तिची 32 वर्षीय सून अंजना दिनेश पाटील हिला अटक केली होती. संजना हिने अंजनाचा पती दिनेशला दत्तक घेतले होते. ती दिनेशच्या कुटुंबासोबत राहायची. मात्र मुंबईतील चार फ्लॅट्सची मालकीण असूनही ती घाटकोपर येथील जैन मंदिराबाहेर भीक मागत असे. चारही फ्लॅट्सच्या भाडय़ाचे पैसे ती घरामध्ये लपून ठेवत असे. यावरून तिचे व आरोपी सून अंजना या दोघींचे अधूनमधून भांडण व्हायचे. याच वादातून अंजनाने वृद्ध संजनाची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अंजनाने जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तिच्या वतीने ऍड. करण भोसले यांनी युक्तिवाद करताना सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी त्यांचा युक्तिवाद व सरकारी पक्षाच्या परिस्थितीजन्य पुराव्यांमधील त्रुटींवर बोट ठेवले.

परिस्थितीचे स्वरूप निर्णायक

गुन्हा घडला, त्यावेळच्या परिस्थितीवरून आरोपीच्या दोषत्वाचा निष्कर्ष काढताना त्या परिस्थितीचे स्वरूप निर्णायक असले पाहिजेत. संबंधित पुराव्यांची एकच साखळी हवी, त्यात कुठलेही अंतर असता कामा नये. विश्वासार्ह पुरावे सादर करून गुह्याच्या परिस्थितीची संपूर्ण साखळी सिद्ध करणे ही सरकारी पक्षाची जबाबदारी आहे, असे नमूद करीत न्यायमूर्ती डांगरे यांनी आरोपी अंजना पाटीलची सशर्त जामिनावर सुटका केली. अंजनाने प्रत्येक तिसऱया महिन्याच्या पहिल्या सोमवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, अशी अट न्यायालयाने घातली आहे.