
घाटल्यातील रखडलेले ‘एसआरए’ प्रकल्प मार्गी लावा! शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी विविध कारणांमुळे रखडलेल्या या प्रकल्पात लक्ष घालून ते मार्गी लावावेत. राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेने केली आहे.
चेंबूरमधील घाटला खारदेवनगर परिसरात सुमारे 20 ते 25 हजारांची लोकवस्ती आहे. कष्टकरी वर्गातील लोक इथे राहतात. त्यांच्यासाठी गेली 12 वर्षे अनेक एसआरए योजना येत आहेत, मात्र त्याच्या अंमलबजावणीला अनेक कारणांमुळे अडथळे आले आहेत. एसआरए आणि समूह विकासाच्या माध्यमातून विकासक परिसराचा विकास करण्यास पुढे आले. 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही राज्य सरकारच्या अधिकारात (3-के) एसआरए प्रकल्प राबवण्यास परवानगी दिली, मात्र काही कारणांमुळे राज्य सरकारने परवानगी दिलेले हे प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आले. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विकासक हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथे विकासकांच्या बाजूने निर्णय झाला. मात्र त्यानंतरही विविध अडचणी सुरूच राहिल्यामुळे प्रकल्प रखडले. त्यामुळे हे रखडलेले प्रकल्प मार्गी लावून या परिसराचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नगरसेवक आणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
























































