चेढंरे ग्रामपंचायतीने 198 सोसायट्या केल्या निर्जंतुक

466

कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा पावले उचलत आहेत. स्थानिक प्रशासन असलेल्या अलिबाग शहराला लागुन असलेल्या चेढंरे ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील 198 सोसायट्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे. जिल्हा प्रशासनासोबत स्थानिक प्रशासनही नागरिकांची आरोग्यासाठी पावले उचलत आहे. तर बाहेरुन आलेल्या व्यक्तिची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

अलिबाग शहराला लागून असलेल्या चेढंरे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सोसायट्या आहेत. कोरोनाची लागण नागरीकांना होऊ नये यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सोसायट्या निर्जंतुक करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना मुक्तीसाठी 198 हाऊसिंग सोसायटी मधील मोकळ्या जागा, जिने व आवारामध्ये निर्जंतुकीकरण, तसेच आजूबाजूच्या परिसरातील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, दुध डेअरी व सर्व एटीएम सेंटर याठिकाणी जंतुनाशक फवारणी मारण्यात आली आहे.

उर्वरीत ठिकाणी सुध्दा फवारणी करणे सुरू आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच यतीन घरत, पोलीस पाटील विकास पाटील, ग्रामविकास अधिकारी निलेश गावंड तसेच सर्व सदस्य याकामी सतत पाठपुरावा करीत आहेत. फवारणीस्थळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. चेढंरे ग्रामपंचायतीने उचलेले हे पाऊल इतर स्थानिक प्रशासनाने उचलणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या