चेन्नईच सुपर किंग

19

सामना प्रतिनिधी, मुंबई

शेन वॉटसनच्या घणाघाती शतकाच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ‘आयपीएल’च्या अंतिम लढतीत सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून धुव्वा उडवत जेतेपदावर मोहोर उमटवली. दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱया महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचे हे तिसरे जेतेपद ठरले. आता सर्वाधिक तीन वेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सनंतरचा चेन्नई सुपरकिंग्ज हा दुसरा संघ ठरलाय.

सनरायझर्स हैदराबादकडून मिळालेल्या १७९ धावांचा पाठलाग करणाऱया चेन्नई सुपरकिंग्जने १८.३ षटकांत दोन गडी गमावून विजयी लक्ष्य ओलांडले. शेन वॉटसनने ५७ चेंडूंत आठ खणखणीत षटकार व ११ दमदार चौकारांची बरसात करीत नाबाद ११७ धावांची तुफानी खेळी साकारली.

विजेत्या संघाला २० कोटी
विजेत्या ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जवर २० कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. तसेच उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला १२.५ कोटी देण्यात आले.

विल्यमसनला ऑरेंज, तर ऍण्ड्रय़ूला पर्पल कॅप
सर्वाधिक ७३५ धावा करणारा सनरायझर्स हैदराबादचा केन विल्यमसन ऑरेंज कॅपचा तर सर्वाधिक २४ बळी गारद करणारा किंग्ज इलेव्हन पंजाबचा ऍण्ड्रय़ू टाय हा पर्पल कॅपचा मानकरी ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या