रंगरंगोटी – कळलेली आणि जमलेली कला

418

>> चेतन कारखानीस

रंगभूषा ही चित्र शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. कलावंताला त्याच्या व्यक्तिरेखेत हीच कला पोहोचवते.

रंगभूषा ही रूपांतरणाची कला आहे. एका कलाकाराला त्याच्या भूमिकेसाठी  रूपांतरित करणं म्हणजे माझ्या दृष्टीने ‘रंगभूषा’. तसेच ती चित्रकला आणि शिल्पकला यांचा संगम आहे आणि विशेष म्हणजे रंगभूषाकाराचा कॅनव्हास हा एखादा कागद किंवा दगड नाही तर जिवंत आणि संवेदनशील व्यक्ती असते.

आमच्यासमोर बसलेली व्यक्ती किंवा कलाकार स्वतःच्या रूपावरून बरेच न्यूनगंड बाळगून असते. तेव्हा रंगभूषाकाराची जबाबदारी असते की, त्याने त्याच्या कलेच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा न्यूनगंड दूर करावा. आपल्या कलेचा परिपूर्ण वापर करून त्या कलाकाराला आत्मविश्वास द्यावा. जो त्यांना त्यांच्या कामात समरस होण्यासाठी मदत करेल. म्हणूनच माझ्यासाठी रंगभूषा ही अतिशय रोमांचकारी कला आणि जबाबदारी आहे, असे मी समजतो.

गेली 15 वर्षे रंगभूषाकार म्हणून काम करत आहे. या प्रवासात मला बरेच गुरू भेटले. त्यांच्याकडून या कलेबाबत धडे घेतले. प्रवीण जवीर, दत्ता भाटकर, चंद्रकांत काटकर, संतोष पेडणेकर यांच्याकडे रंगमंचावरील रंगभूषा शिकलो. पंढरी जुकर यांच्याकडे सिनेमा आणि टेलिव्हिजनसाठी कराव्या लागणाऱया मेकअपचे धडे घेतले. ‘यदा कदाचित’ आणि ‘यदा कदाचित-भाग 2’, ‘लाली- लाला’ ‘ह्रदयी वसंत फुलताना’ अशा काही नाटकांत सहाय्यक म्हणून सुरुवातीला काम केले.

कलाक्षेत्र फारच मोहक आहे. इथे काम करताना त्याची भुरळ पडून वास्तवाचा विसर पडू शकतो. असं होऊ न देता प्रामाणिकपणे आणि विनम्रतेने आपलं काम करत राहणे ही गुरुकिल्ली आहे. कुठलेही काम करताना त्याच्यातील रंगभूषेच्या खोलात जातो. माझ्या कामात वास्तव आणि सुयोग्यता (परफेक्शन) यांचा समतोल राखायचा प्रयत्न करतो. माझ्या पारिवारिक जबाबदाऱया पार पाडू शकण्याची शक्ती आणि आनंद या कलेमुळे मिळाला आहे. त्यासाठी मी खूप ऋणी आहे. सध्या मी रंगभूषा शिकवत आहे. मला कळलेली आणि जमलेली कला शिकवणं ही मोठी जबाबदारी असते. ती पेलवता येवो, अशी देवाकडे प्रार्थना करतो.

आपली प्रतिक्रिया द्या