
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
आरएसएसला घटनेच्या चौकटीत आणा असा आग्रह धरणार्या बाळासाहेब आंबेडकरांनी जागा वाटपामध्ये अखेरपर्यंत तडजोड केली नाही. आता पायात पाय घालून काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा पाडण्यासाठी उमेदवार उभे करून आरएसएसला कोणत्या चौकटीत तुम्ही बसविणार आहात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. वंचित बहुजन आघाडी ही मताचे विभाजन करण्यासाठीच मते मागत असून माझ्यावर प्रेम करणार्या माझ्या बांधवांनो तुमच्या मतांमध्ये फुट पडू देऊ नका असे भावनीक आवाहन छगन भुजबळ यांनी जळगाव जामोद येथे केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी, शेकाप, मनसे, पिरीपा, आरपीआय गवई गट व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ छगन भुजबळ यांची जळगाव जामोद येथे शुक्रवारी जाहीर सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.
काँग्रेस हा गाढवांचा पक्ष, प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, ज्या भाजप सरकारने मला अडीच वर्ष तुरूंगात टाकले, ओबीसींचे हक्क हिरावून घेतले. आरक्षण काढून टाकण्याची भाषा केली, विदयार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली. 314 ओबीसींच्या आएएस झालेल्या मुलांचे ट्रेनिंग होऊन त्यांना नोकरीवरून काढून टाकले त्यांना तुम्ही मते देणार काय? असा प्रश्न करीत ही लढाई साधी नाही. ही लढाई संविधान विरूध्द मोदी अशी आहे, मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास या देशात पुन्हा निवडणूका होणार नाहीत देशात हुकुम शाहीचे राज्य येईल तेव्हा हा देश वाचवायचा असेल तुमच्या भावी पिढीचे भविष्य आबाधीत ठेवायचे असेल तर फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांच्या आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मतदान करून निवडून दया असे आवाहन त्यांनी केले.

























































