शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांमध्ये घोलपांचे नाव सर्वात वर, छगन भुजबळ यांची टीका

माजी मंत्री बबन घोलप हे आता कितीही निष्ठावान असल्याचं दाखवत असले तरी शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची इच्छा असणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव सगळ्यात वर होतं, अशी टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावरून घोलप यांनी केलेल्या वक्तव्यावर भुजबळ यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे.

छगन भुजबळ यांनी सोमवारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी घोलप यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बबन घोलप हे सध्या निष्ठावान असल्याचं दाखवत आहेत, मात्र 1999मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाणाऱ्या 36 आमदारांच्या यादीत घोलप यांचं नाव आणि स्वाक्षरी यादीत सर्वात वर होती, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.

बबन घोलप यांनी एक ते दीड वर्षांपूर्वी भुजबळ हे शिवसेनेत येणार होते, मात्र आपण त्यांचा प्रवेश रोखल्याचा दावा केला होता. त्याला प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, आजपर्यंत शिवसेनेत जायचं असल्याचं कुणाकडेही मी म्हटलेलं नाही. कुणाला भेटायलाही गेलो नाही. कार्यकर्ते चर्चा करत असतील तर त्याबाबत आपल्याला माहिती नाही. घोलप यांनी काहीही कारण नसताना हा विषय काढला असून घोलप हेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत, असा दावा यावेळी भुजबळ यांनी केला.