
मुंबईतील उत्तर भारतीयांकडून दरवर्षी चौपाटय़ा, नदीकिनारी होणारी छटपूजा या वर्षी कृत्रिम तलावांजवळ साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने समुद्रकिनारी, नदीकिनारी जायला बंदी घातली असून मोकळ्या मैदानात कार्यक्रमाचे आयोजक कृत्रिम तलावांची निर्मिती करणार आहेत.
20 आणि 21 नोव्हेंबरला छटपूजा आहे. त्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे. या सणाच्या निमित्ताने लोक समुद्रकिनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठय़ा संख्येने येतात. मुंबईकरांनी शारीरिक अंतर पाळले, मास्क वापरून सहकार्य केले तसेच सहकार्य छटपूजेच्या वेळीदेखील करावे आणि पालिकेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.




























































