
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, दोन वर्षांनंतर 2019 मध्ये आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले, तेव्हापासून हा खटला प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने विशेष बाब म्हणून उच्च न्यायालयात अर्ज करून विशेष बेंचची मागणी करीत हा खटला फास्टट्रॅक पद्धतीने चालवून सहा महिन्यांत निकाल लावावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून, मेरिटवर उच्च न्यायालयात तातडीने राज्य सरकारने ऑप्लिकेशन देण्याची मागणी करणार आहोत, असे संभाजीराजे छत्रपतीयांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभर दौरे करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याची सुरुवात आज कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील निर्भयाच्या स्मारकाला अभिवादन करून केली. त्यानंतर त्यांनी निर्भयाच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील समन्वयक व कोपर्डी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी समन्वयक संजीव भोर पाटील, करण जायकर, अंकुश कदम, विनोद साबळे, रघुनाथ चित्रे, गंगाधर काळकुटे, रमेश केरे, लालासाहेब सुद्रिक, सूर्यभान सुद्रिक, सतीश सुद्रिक, सकल मराठा समाजाचे कर्जतचे समन्वयक काळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक बोस, नीलेश तनपुरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘कोपर्डी येथील निर्भयाप्रकरणी 2017 साली न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, न्यायालयीन तरतुदीनुसार आरोपींना दोन वर्षांनंतर अपील करण्याची मुभा असल्यामुळे त्यांनी सन 2019 मध्ये उच्च न्यायालयात अपील केले आहे. तेव्हापासून हा खटला प्रलंबित आहे. याप्रकरणी पीडितेचे आई-वडील यांचा आजही आक्रोश सुरू असून, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. चार वर्षे उलटून गेले तरी त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने कोपर्डी प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये विशेष बाब म्हणून अर्ज करून या खटल्यासाठी विशेष बेंचची मागणी करावी. हा खटला विशेष बेंचसमोर फास्टट्रक पद्धतीने चालवून सहा महिन्यांत याचा निकाल द्यावा’, अशी मागणी त्यांनी केली.






























































