देवदर्शन करून परतणार्‍या भाविकांची कार डिव्हायडरवर आपटली, गाडीने पेट घेतल्याने पाच जण जखमी

छत्रपती संभाजीनगरहून देवदर्शन घेऊन सोलापूरला मध्यरात्री परत जाणार्‍या शिक्षकांची कार दुभाजकाला धडकल्याने कारने थेट पेट घेतला. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. सोमवारी 4 ऑगस्ट रोजी रात्री अडीज वाजेच्या सुमारास जालन्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला.

सुरेश उटगीकर,सागर रामपुरे ,तुकाराम मुचंडे,विठ्ठल शिवशेठी, बाबू पवार सर्व रा.सोलापूर अशी या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची नावे असून ते सर्व  शिक्षक आहेत. श्रावणी सोमवार निमित्त हे सर्वजण सोलापूर येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. रात्री बारा वाजता हे सर्व शिक्षक घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन सोलापूरकडे परतत असताना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर आदळली. कार दुभाजकाला धडकल्यानंतर कारने काही क्षणांमध्येच मोठा पेट घेतला होता. हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांना मिळतात त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन कारमधील जखमींना बाहेर काढले व तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत हे करीत आहेत.