छत्रपती शिवरायांचा इतिहास सीबीएसईच्या अभ्यासक्रमात

chhatrapati-shivaji-maharaj-history-to-be-included-in-cbse-syllabus-maharashtra-minister-pankaj-bhoyar

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शिवरायांचा इतिहास सीबीएसईच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना दिली.

सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. यावेळी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी, शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर चर्चेत सहभागी झाले होते.

राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना भेटून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा योग्य, सखोल व प्रेरणादायी परिचय मिळावा याचे महत्त्व सांगितले जाणार आहे.

राज्य शासनाच्या पाठपुराव्यामुळे ‘द राईज ऑफ मराठा’ हे स्वतंत्र प्रकरण सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एनसीईआरटीकडे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.