
छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सर्वात मोठे नक्षलवादी आत्मसमर्पण झाले आहे. शुक्रवारी तब्बल 210 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून हातात संविधान घेत त्यांनी पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक म्होरक्यांचा समावेश आहे. ‘नक्षल निर्मूलन धोरण’ अंतर्गत राज्य सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा आत्मसमर्पण समारंभ आयोजित केला. मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, आजचा दिवस केवळ छत्तीसगडसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे, कारण नक्षलवादी इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार सोडून संविधान आणि विकासाच्या मार्गावर परतत आहेत.
नक्षलग्रस्त बस्तर विभागात शुक्रवारी ही ऐतिहासिक घटना घडली आहे. रिझर्व्ह पोलिस लाईन्स येथे आयोजित समारंभात सुमारे 210 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. नक्षलवाद्यांकडून एकूण 153 शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यात AK-47, SLR, INSAS रायफल, LMG, 303 रायफल, कार्बाइन, पिस्तूल आणि BGL लाँचर्स यांचा समावेश आहे. शरणागतीपूर्वी नक्षलवाद्यांनी परेड आयोजित केली आणि संविधानाच्या प्रती हातात घेतल्या. मुख्य समारंभातही त्यांनी हातात संविधान धरले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 110 महिला आणि 98 पुरुष नक्षलवादी होते.
मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी या प्रसंगाला ऐतिहासिक आणि निर्णायक दिवस म्हटले. ते म्हणाले, हा केवळ छत्तीसगडसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे, जेव्हा मोठ्या संख्येने नक्षलवादी बंदुकीऐवजी संविधान हाती घेत आहेत. सरकार त्यांना कौशल्य विकास आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध करून देईल जेणेकरून ते सन्माननीय जीवन जगू शकतील, असे ते म्हणाले.
आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी अबुझमाद परिसरातून जगदलपूरमध्ये आले. समारंभात, या नक्षलवाद्यांनी हातात भारतीय संविधान धरून पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर हिंसाचाराचा त्याग करण्याची शपथ घेतली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या पुनर्वसनाचा भाग म्हणून त्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.