छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमक; 1 कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून कुख्यात नक्षली माडवी हिडमा, त्याची पत्नी राजे हिच्यासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हिडमावर 1 कोटी रुपयांचे, तर त्याची पत्नी राजे हिच्यावर 40 लाखांचे बक्षीस होते.

कुख्यात नक्षली हिडमा हा दोन डझनहून अधिक नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता. 2010 छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सीआपीएफच्या ताफ्यावर हल्ला करून 76 जवानांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याचा हिडमा हाच सूज्ञधार होता.

2013 मधील बस्तरमधील झिरमा खोऱ्यात काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचाही तोच सूत्रधार होता. या हल्ल्यात काँग्रेसचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, महेंद्र कर्मा आणि विद्याचरण शुक्ल या वरिष्ठ नेत्यांसह 27 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 2021 मध्ये सुकमा-बिजापूर सीमेवर झालेल्या हल्ल्याचा कटही हिडमाने रचला होता आणि यात 22 जवान शहीद झाले होते.

छत्तीसगड-आंध्र प्रदेश-तेलंगणाच्या सीमेवर असणाऱ्या अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील घनदाट जंगल नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे नक्षलवाद्यांचे गुप्त तळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. मंगळवारी पहाटे साडे सहा वाजता मरेदुमिल्ली मंडळ जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी आमनेसामने आले. यावेळी जोरदार धुमश्चक्री उडाली. या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले असून यात कुख्यात नक्षली हिडमा, त्याची पत्नी राजे हिचाही समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अमित बरदार यांनी दिली.

क्रूरकर्मा हिडमा

शेकडो नागरिक, जवान यांच्या मृत्युस जबाबदार असलेल्या हिडमाचा जन्म 1981 मध्ये छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात झाला होता. कमी वयातच तो पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’च्या एका बटालियनचा प्रमुख बनला होता. त्यानंतर क्रूरपणे हल्ले करत तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सर्वात तरुण सदस्य बनला. हिडमावर केंद्र सरकारने 50 लाख तर वेगवेगळ्या राज्यांनी मिळून 1 कोटींचे बक्षीस ठेवले होते. काही दिवसांपूर्वी हिडमाच्या आईने त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मात्र त्याने नकार दिला आणि आता चकमकीत तो ठार झाला.