गडचिरोलीमध्ये नक्षलवादी-पोलिसांमध्ये 12 तासांपासून चकमक; हेलिकॉप्टरने कमांडोंना पाठवले

महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील गडचिरोलीतील भामरागडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये 12 तासांपासून चकमक सुरू आहे. भामरागडजवळील जंगलातील आबुजमाड डोंगरावर चकमक सुरू आहे. ही चकमक सुरू असल्याने हवाई दलाने हेलिकॉप्टरद्वारे अतिरिक्त कमांडेची तुकडी घटनस्थळी पाठवण्यात आली आहे. या भागात सशस्त्र नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर अचानक हल्ला केल्याने चकमकीला सुरुवात झाली होती.

महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी आणि सी 60 कमांडोमध्ये चकमक सुरू आहे. सशस्त्र नक्षलवाद्यांनी सापळा रचून सुरक्षादलावर हल्ला केला. चकमक सुरू झाल्यानंतर 270 पोलिसांसह 9 दलांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. छत्तीसगड पोलिसांनीही सुरक्षा दलाला मदत पुरवली आहे. चकमक सुरू झाल्यानंतर हवाई दलाकडून मदत मागण्यात आली होती. त्यानंतर हवाई दलाने हेलिकॉप्टरने घटनास्थळी जवानांना पाठवले आहे.

चकमकीत जखमी झालेल्या एका जवानावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा दल डोंगरावर असून नक्षलवाद्यांनी डोंगरावरील सर्व वाटा घेरल्या आहेत. नक्षलवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात येत आहे. सुरक्षा दलाकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू- अनिल देखमुख

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील काही दुर्गम भाग नक्षलग्रस्त आहे. पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून अंबुजमाड येथील शस्त्रास्त्र उत्पादक फॅक्टरीवर छापा टाकून ती नष्ट केली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या