
पावसाळी अधिवेशनात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडल्याने चांगलाच राडा झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारी लातूरला आले होते. त्यांच्यासोबत उदगीरचे आमदार संजय बनसोडे होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत असताना अचानक छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन राज्याच्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ घोषणा देत कोकाटेंच्या राजीनामाची मागणी केली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी बसवा आणि पत्ते खेळायला द्या, असे म्हणत छावा कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर टेबलावर पत्ते फेकले. त्यानंतर ते दुसऱ्या खोलीत निघून गेले.
थोड्या वेळाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, छावाचे कार्यकर्ते बसलेल्या खोलीत आले आणि त्यांनी जोरदार मारहाण सुरू केली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याने त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.
छावाचे दादा गटाला आव्हान
या मारहाण झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे म्हणाले की, अजित दादा यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. त्यांनी छावाला डिवचले आहे. आमच्या निवेदनाला लाथाबुक्यांचे उत्तर देणार असाल, तर आम्हीही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पाहून घेऊत असा इशारा त्यांनी दिला.