कोरोना व्हायरसच्या भितीमुळे कोंबडीचे दर पडले

1053

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हिंदुस्थानने हा व्हायरस परतून लावण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे चिकन व्यवसायाला फटका बसला आहे. चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो अशी अफवा सोशल मीडियावर पसरल्याने खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. चिकनचे दर 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

वांद्रे, कुर्ला, अंधेरी आणि चेंबुर भागातील पोलट्री व्यावसायिकांना कोरोना व्हायरसच्या अफवांचा चांगलाच फटका बसला आहे. खरेदीदारांनी चिकन घेण्यास कमी केल्याने विक्रेत्यांनी किंमती कमी केल्या आहेत. 200 रुपये किलोने विकले जाणारे चिकन आता 160 रुपयांना मिळात आहे.

चिकन विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सऍप आणि इतर सोशल मीडियावर जुने स्वाईन फ्लूचे मेसेजस फिरत आहेत. अनेक मांस विरोधी आणि औषध विकणार्‍या कंपन्यांनी हे मेसेजेस पसरवले आहेत. कोरोनाचा आणि चिकनचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

पोलट्री व्यावसियाकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जर हे चित्र कायम राहिले तर रमझानच्या काळात चिकनचा तुटवडा निर्माण होईल अशी भिती व्यावसियाकांनी व्यक्त केले आहे. सध्या काही लोकांना चिकन स्वस्तात मिळत आहे म्हणून खूष आहेत परंतु काही दिवसांना त्यांच्याही पाकिटाला फटका बसणार आहे असे व्यावसायिकांनी सांगितले आहे.

असे असले तरी या अफवांचा फटका मटण आणि अंड्यांना बसला नाही. कोरोनाचा आणि चिकनचा दुरान्यवे संबंध नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. तरी लोक अफवांना बळी पडत आहे त्यामुळे विक्रेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

चिकनमुळे कोरोना व्हायरस पसरत नाही असे पशुपालन आयुक्त डॉ. प्रवीण मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लोकांनी बिनधास्त चिकन खावे असेही त्यांनी सांगितले होते. राज्यात गेल्या काही दिवसांत चिकनमुळे कोरोना होतो अशी अफवा पसरत आहे. या अफवा पसरवणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असे निर्देश राज्याचे पशूपालन मंत्री सुनील केदार यांनी दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या