याह… याह… म्हणण्यापेक्षा येस… येस… म्हणा, याह म्हणायला हे काही कॉफी शॉप नाही. अशा शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांना शिष्टाचाराचा धडा शिकवला. आज एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना एक वकील माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी करण्याची मागणी करत होते. हे वकील न्यायालयात त्यांच्या याचिकेबद्दल बोलत होते. त्यानंतर सरन्यायाधीश त्यावर टिप्पणी करत असताना हे वकील सतत मान डोलावून याह, याह करत होते. त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना सुनावले.
सरन्यायाधीशांनी ऐकवल्यानंतर त्यांनी माफी मागितली व त्यांचा मुद्दा मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा एकदा हे वकील बोलताना अडखळले. तसेच त्यांनी पुन्हा एकदा याहचा उच्चार केला. त्यावर सरन्यायाधीशांनी पुन्हा त्यांना येस उच्चारण्यास सांगितले. तसेच हे काही कॉफी शॉप नाही. मला तुमच्या याह याहची अॅलर्जी आहे. न्यायालयात अशा व्यवहाराची अनुमती देता येणार नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले. दरम्यान, या वकिलाने 2018 मध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात इन-हाऊस तपास करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.