
बिहारच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाला. तशीच राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विरोधकांची माती होणार, असे वक्तव्य करून राज्यातही भाजप कारस्थान करून पाशवी बहुमत घेणार असल्याचे मनसुबे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवले. शहरातील विमानतळासमोर उभारण्यात आलेल्या भाजपच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याच नावाचा जप केला आणि विरोधकांना दुषणे दिली. ते म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत तेथील जनतेने विरोधकांचा सुपडा साफ केला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजयी रथ पुढे जात आहे. काँग्रेससह विरोधक जनतेचे प्रश्न मांडत नाहीत. त्यामुळे त्यांची अशीच माती होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही विरोधकांची माती होणार, असे भाकीत व्यक्त करून विरोधकांना हरवण्यासाठी काहीही करू शकतो, हे बोलून दाखवले.
महायुतीत आलबेल नसल्याची कबुली
या वेळी महायुतीत आलबेल नसल्याचे त्यांच्या भाषणातूनही जाणवले. यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिथे शक्य तिथे महायुती म्हणून लढवाव्यात. मात्र जिथे महायुती करायची नाही तिथे लक्षात ठेऊन लढाई करायची. मात्र जो कुणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच राहील, असेही फडणवीस म्हणाले.



























































