मुख्यमंत्र्यांना ‘आदित्य’चा धसका! बछड्यांच्या नावाची चिठ्ठीच बाजूला ठेवली

सिद्धार्थ उद्यानातील वाघांच्या बछड्यांचे नामकरण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आदित्य’ नावाचा चांगलाच धसका घेतला. नामकरण करण्यासाठी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी निघताच मुख्यमंत्र्यांनी लगबगीने ती बाजूला ठेवली आणि दुसरी काढली!

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने एका बछड्याला तर अर्पिता वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला. यापैकी एक बछडा दगावाला. उर्वरित तीन बछड्यांचे नामकरण आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. लोकांकडून मागविण्यात आलेल्या नावांच्या चिठ्ठ्यांतून एक चिठ्ठी मुख्यमंत्र्यांनी काढली. त्यात ‘श्रावणी’ हे नाव निघाले. त्यानंतर दुसरी चिठ्ठी अजित पवार यांनी काढली. त्यात ‘आदित्य’ हे नाव निघाले. ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी निघताच मुख्यमंत्री अस्वस्थ झाले, सुधीर मुनगंटीवार यांनी ती चिठ्ठी बाजूला काढली. मुख्यमंत्र्यांनी लगेच ती चिठ्ठी बाजूला ठेवत दुसरी काढली. त्यात ‘विक्रम’ हे नाव निघाले. तिसरी चिठ्ठी सुधीर मुनगंटीवार यांनी काढली. त्यात ‘कान्हा’ हे नाव निघाले.

अजित पवारांचे कानावर हात
बछड्यांच्या नामकरणाच्या वेळी ‘आदित्य’ नावाच्या चिठ्ठीवरून राजकारण झाले. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आदित्य नावाची चिठ्ठी बाजूला ठेवण्यास सांगितले का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क कानावर हात ठेवून ‘मला काही आठवत नाही’, असे सांगितले.