
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शनिवारी कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. त्या संशयिताच्या रक्ताचे नमुने तापसणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट मिळाले असून ते कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे. सौदी अरेबियातून परतलेला कोरोना संशयित रुग्ण चिखली येथील जुन्या गावातील 71 वर्षांच्या वृद्धाचा शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी इंदिरा गांधी मेडीकल कॉलेज नागपूर येथे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडीत यांना मिळाले असून त्या मृताचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती त्यांनी दिली. मृताच्या मुलाने आपल्या वडिलांचा मृत्यू मधुमेह आणि रक्तदाबाच्या आजाराने झाल्याचे शनिवारी स्पष्ट केले होते. आता त्याचे नमुन्याचा अहवालात ती व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे.





























































