
सुमारे 20 वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा चिकनगुणियाचा विषाणू पुन्हा एकदा परतला आहे. गेल्या काही महिन्यांत चिकनगुनिया विषाणू ला रियुनियन, मेयोट आणि मॉरिशस सारख्या बेटांवरून मादागास्कर, सोमालिया आणि केनिया सारख्या आफ्रिकन देशांमध्ये पसरला आहे. आता तो चीनमध्ये वेगाने पसरत आहे. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया विषाणूचे 7 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या विषाणूला साथीचे स्वरूप येऊ नये म्हणून, चीनमध्ये मोठे महाकाय डास सोडले जात आहेत. जेणेकरून हे मोठे डास लहान डासांना मारू शकतील. सरकारने चिनी प्रांतातील सर्व लोकांना त्यांच्या घरात साचलेले पाणी काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास 1 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड आकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या महिन्यात इशारा दिला होता की, चिकनगुनिया पुन्हा एकदा आशियाई देशांपासून युरोपपर्यंत कहर करू शकतो. सध्या आशिया आणि युरोपातील अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. WHO ने सांगितले होते की सध्या 119 देशांमधील सुमारे 560 कोटी लोकांना चिकनगुनिया संसर्गाचा धोका आहे.
दरवर्षी केवळ चीनमध्येच नाही तर, हिंदुस्थानमध्येही चिकनगुनियाचे रुग्ण आढळतात. पावसाळ्यात डास वाढतात आणि चिकनगुनियाचा विषाणूही अधिक पसरू लागतो. 2005 मध्ये चिकनगुनियाने साथीचे रूप धारण केले आणि नंतर हा आजार हिंदी महासागरातील लहान बेटांपासून सुरू झाला आणि 5 लाखांहून अधिक लोकांमध्ये पसरला.
WHO च्या मते, एक काळ असा होता जेव्हा चिकनगुनिया विषाणू उष्णकटिबंधीय देशांमध्ये पसरत असे. तेव्हा युरोपमध्ये त्याचा धोका खूप कमी होता, परंतु आता युरोपमध्येही चिकनगुनिया विषाणूचे रुग्ण दिसून येत आहेत. हवामान बदल आणि जागतिक पर्यटनामुळे हा विषाणू आता युरोपमध्येही पसरत आहे. अलिकडेच इटलीमध्येही चिकनगुणियाच्या रुग्णाची नोंद झाली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, आता चिकनगुणिया आशियाई देशांमधून युरोपमध्ये पसरत आहे.