महिला कैद्यांना बालसंगोपनाचे धडे

मंगेश सौंदाळकर, मुंबई

लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, वृद्धांना आधार कसा द्यावा, त्यांच्या व्यायाम, त्यांचा आहार याचे धडे सध्या भायखळा येथील महिला कैद्यांना दिले जात आहेत. किरकोळ ते गंभीर गुह्यात अटक झालेल्या या महिला कैद्यांसाठी बालसंगोपन आणि वृद्धांची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

सध्याच्या स्थितीत भायखळा तुरुंगात 422 महिला आणि 18 मुले आहेत. तुरुंगातून सुटल्यावर महिला कैद्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. काही दिवसांपूर्वी एका महिला कैदीने बाळाला जन्म दिला. मात्र तिला तिच्या बाळाचे संगोपन करताना अडचणी येत होत्या. त्याची दखल घेत एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिला कैद्यांना बाल संगोपन कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. दक्षिण विभाग (कारागृह) विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन यांच्या संकल्पनेतून तुरुंग अधीक्षक अरुणा मुगुटराव यांनी एक महिन्याचा कोर्स नुकताच सुरू केला आहे.

जेलर माधुरी मोरे यांच्याकडे या उपक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोर्सला येण्यापूर्वी महिला कैद्यांचे समुपदेशन करण्यात आले. आठवडय़ातून तीन दिवस हा उपक्रम दुपारी 12 ते 3 या वेळात सुरू असतो. महिला कैदी तुरुंगातून सुटल्यावर त्या मुलाची काळजी घेण्याचे काम सहज करू शकतात.

वृद्धांची काळजी घेण्याचेही प्रशिक्षण

बाल संगोपनाप्रमाणेच वृद्धाची काळजी कशी घ्यावी, याचेही धडे महिला कैद्यांना दिले जाणार आहेत. वृद्धाची काळजी घेण्याकरता  आयाबाई उपलब्ध न झाल्यास पर्याय म्हणून अशा वृद्धांना वृद्धाश्रमात टाकले जाते. त्यामुळे हा कोर्स महिला कैद्यांना फायदेशीर ठरू शकतो.

नुकताच बाल संगोपन कोर्स सुरू करण्यात आला असून 25 महिला बंदी त्यात सहभागी झाल्या आहेत. त्यांना या कोर्सेस चा भविष्यात निश्चित फायदा होईल-अरुणा मुगुटराव, तुरुंग अधीक्षक

आपली प्रतिक्रिया द्या