
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नातेवाईकांनी तोंड फिरवले आहे. आपल्या वृद्ध नातेवाईकांना आधार देण्यास कित्येक मुले नकार देतात. अशा वेळी लहान मुले बरेच काही शिकवून जातात. ‘तू काळजी करू नको, तुझी तब्येत सुधारतेय,’ असे भावनिक पत्र रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईला मुलांनी लिहिले आहे. आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले असून 43 हजारांहून अधिक लोकांनी त्यास लाईक केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला आहे. यात एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर या महिलेच्या मुलांनी तिच्यासाठी एक पत्र लिहिले. जे वाचल्यानंतर लोक खूप भावुक झाले. मुलांनी लिहिले की, ‘आई, आम्ही खालीच आहोत. तुझी तब्येत सुधारतेय. आम्ही तुला लवकरच घेऊन जाऊ. तू काळजी करू नको’, असं भावनिक पत्र लिहिलं आहे. पत्राच्या खाली मुलांची नावे लिहिण्यात आली आहेत.
























































