लहान मुलांची लस जानेवारीत येणार

लहान मुलांसाठी कोरोनावरील लस कधीपर्यंत उपलब्ध होणार याविषयी सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी 2022 पर्यंत लहान मुलांसाठी लस येईल, अशी माहिती पूनावाला यांनी दिली आहे.

सिरम इन्स्टिटय़ूटच्या हडपसरमधील प्लाण्टमध्ये लहान मुलांसाठीच्या कोवावॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये लहान मुलांसाठी लस येईल, असे पूनावाला यांनी सांगितले. लसीच्या तपासण्यांसाठी अनेक स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. या चाचण्या व्यवस्थित सुरू असून या वर्षाखेरीसपर्यंत चाचण्यांचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोवावॅक्स ही लस लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सिरम इन्स्टिटय़ूट टप्प्याटप्प्याने यावर काम करीत असून 12 वर्षांच्या खालील मुलांचादेखील चाचण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या नोवोवॅक्स या पंपनीने लसीच्या उत्पादनासंदर्भात सिरम इन्स्टिटय़ूटसोबत करार केला आहे. NVX-CoV2373 अर्थात Covovax असे या लसीचे नाव आहे. हिंदुस्थानात चाचणी घेतली जाणारी ही चौथी लस असून 2 ते 17 या वयोगटात ही लस दिल्यानंतर संबंधिताची प्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते आणि ही लस किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी चाचण्या घेतल्या जात आहेत. यासाठी देशभरातील एकूण 10 ठिकाणांहून 920 स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी दोन ठिकाणे पुणे येथील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या