
पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवला जाणार आहे. यासाठी पालिकेने ‘झायडस कॅडीला’ कंपनीची ‘झायकोविट’ लस देण्यासाठी कंपनीला पत्र दिले आहे. तिसऱया लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी ही माहिती दिली.
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी ऑगस्टमध्ये संभाव्य तिसरी लाट येण्याचा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. त्यामुळेच पालिकेने संपूर्ण आरोग्य यंत्रणा तैनात करून जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार आहे. तिसऱया लाटेत लहान मुलांना धोका जास्त असल्याने ‘झायडस कॅडीला’ कंपनीला पत्र दिले आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर नायरमध्ये दररोज 50 मुलांना लस देण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ. भारमल म्हणाले. आठवडाभरात ही परवानगी मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र म्हणते, सप्टेंबरपासून परवानगी!
तिसऱया लाटेतील लहान मुलांना असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पेंद्रानेही वेगाने लसीकरणासाठी कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी झायडस कॅडीला कंपनीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. यामुळे सप्टेंबरपासून 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते, अशी माहिती लसविषयक राष्ट्रीय तज्ञ समितीचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे. भारत बायोटेकची लहान मुलांसाठीची कोव्हॅक्सिन ही लसही लवकरच उपलब्ध होऊ शकते.
यासाठी तिसऱया टप्प्यातील चाचण्या सुरू असून सप्टेंबरमध्ये हे काम पूर्ण होईल अशी माहितीही डॉ. अरोरा यांनी दिली. दरम्यान, केंद्र सरकार आरोग्य क्षेत्रासाठी एक पायाभूत सुविधा पॅकेज तयार करीत असून पुढील नऊ महिन्यांत हे पॅकेज लागू केले जाणार असल्याचे देशाचे नवनियुक्त आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये 736 जिह्यांत बालरोग केंद्रे सुरू केली जातील आणि त्यात 4 हजार आयसीयू बेड असतील, असेही मंडविया यांनी सांगितले आहे.


































































