
पालकांचा घटस्फोट झाला आहे किंवा मुलगा आपल्या मृत वडिलांसोबत राहत नव्हता, या कारणास्तव मुलाला अनुकंपा तत्त्वावर मिळणारी नोकरी नाकारणे पूर्णपणे चुकीचे आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीला नोकरी मिळाली आहे, या कारणास्तव मुलाला अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे.
संबंधित तरुणाच्या वडिलांच्या निधनानंतर त्याने अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता, जो प्रशासनाने नाकारला होता. या निर्णयाविरोधात त्याने याचिका दाखल केली होती. एकल खंडपीठाने त्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती संजीव प्रकाश शर्मा आणि न्यायमूर्ती बलजिंदर संधू यांच्या खंडपीठासमोर झाली.
राज्य सरकारचा दावा
आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीने नियुक्तीसाठी अर्ज केला. यानुसार तिला सरकारी नोकरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पहिल्या पत्नीचा मुलगा अनुकंपा तत्त्वाने सरकारी नोकरी मिळावी यासाठी अपात्र ठरतो, असा युक्तिवाद राजस्थान सरकारने केला.
हायकोर्ट काय म्हणाले…
मुलगा वडिलांसोबत राहत नव्हता याचा अर्थ तो त्यांच्यावर अवलंबून नव्हता असा होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण राजस्थान हायकोर्टाच्या खंडपीठाने नोंदवले आणि राज्य सरकारची याचिका फेटाळली. तसेच राज्य सरकारने केलेली दुसऱ्या पत्नीला दिलेली सरकारी नोकरी ही विधवा कोट्यांतर्गत दिली होती. दुसऱ्या पत्नीला मिळालेली नियुक्ती ही मुलाच्या 1996 च्या नियमांनुसार असलेल्या स्वतंत्र अधिकाराला बाधा आणू शकत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

























































