
अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा अयशस्वी ठरल्याने आता पुन्हा दोन्ही देशात तणाव पुन्हा वाढला आहे. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी जाहीर केली असताना, इराणने अमेरिकेला इशारा देत प्रत्युत्तर दिले आहे. चीननेही ट्रम्प यांच्या चीनवरील शुल्कवाढीच्या धमकीला प्रत्युत्तर देत उघडपणे इराणची बाजू घेतली आहे. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, असा थेट इशाराही चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात कारवाईला वेग देत असल्याचे दिसत आहे. या निर्णयांचा परिणाम केवळ इराणवरच नाही, तर चीनवरही होत आहे. इराणला चीनकडून मिळणाऱ्या लष्करी मदतीशी संबंधित गुप्त माहितीच्या आधारे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एक मोठे विधान केले, याचे परिणाम गंभीर असतील. ते असे करतील असे मला वाटत नाही. जर आम्ही त्यांना असे करताना पकडले, तर चीनवर ५०% शुल्क आकारले जाईल,असा इशारा ट्रम्प यांनी चीनला दिला होता.
चीनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून म्हणाले, चीन जगात शांतता आणि स्थिरतेसाठी कटिबद्ध आहे आणि मध्य पूर्वेतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आमची जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सतत ये-जा करत असतात. आमचे इराणसोबत व्यापार आणि ऊर्जा करार आहेत. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये इतर कोणीही हस्तक्षेप करू नये अशी अपेक्षा करतो. होर्मुझवर इराणचे नियंत्रण आहे आणि ते आमच्यासाठी खुले आहे, असे चीनने स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांच्या नाकेबंदीचा चीनच्या ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण चीन हा इराणच्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. परिणामी, होर्मुझमार्गे होणाऱ्या वाहतुकीत कोणताही व्यत्यय आल्यास केवळ इराणच्या महसुलालाच फटका बसणार नाही, तर चीनच्या तेल पुरवठ्यालाही मोठा धोका निर्माण होईल, जे चिनी अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. यामुळेच ट्रम्प यांच्या धमकीला चीनने प्रत्युत्तर दिले आहे.
अमेरिका इराणशी लढत असो किंवा व्हेनेझुएलावर हल्ला करत असो, चीन नेहमीच एक लक्ष्य राहिला आहे. म्हणूनच चीनने आता उघडपणे इराणला पाठिंबा दिला आहे. चीन हा इराणच्या तेलाचाही सर्वात मोठा ग्राहक आहे, त्यामुळे इराणवर हल्ला करून ट्रम्प यांनी एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य केली आहेत.आता चीननेही आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला आव्हान दिल्याने दोन्ही देशातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.





























































