
लडाखमधील हिंदुस्थानी जमिनीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्या चीनचा आता भुतानच्या जमिनीवर डोळा आहे. सीमेवर असलेल्या भुतानमधील सकतेंग अभयारण्याच्या जमिनीवर चीनने दावा केला आहे. पण भुतानने चीनला विरोध दर्शवून ही जमीन म्हणजे भुतानचा अविभाज्य भाग असल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे.
भुतान आणि चीनच्या सीमेची आखणी अजून झालेली नसल्याने चीनने अभयारण्याची जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्लोबल एन्व्हायरनमेंट फॅसिलिटी काऊन्सिलच्या 58 व्या बैठकीत चीनने सकतेंग वन्यजीव अभयारण्याची जमीन वादग्रस्त असल्याचे म्हटले. तसेच या अभयारण्य योजनेला होणार्या निधी पुरवठय़ालाही विरोध केला.
सकतेंग अभयारण्यासाठी कधीही आणि कुठूनही निधी पुरवठा झालेला नाही. पहिल्यांदाच या अभयारण्यासाठी निधी मिळत असल्याने संधी साधून चीनने या जमिनीवर आपला दावा केला असल्याचे सांगितले जाते. मात्र चीनच्या विरोधानंतरही काऊन्सिलने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
ग्लोबल एन्व्हायरनमेंट फॅसिलिटी काऊन्सिलमध्ये चीनचा प्रतिनिधी आहे, परंतु भुतानचा प्रतिनिधी नाही. भुतानचे प्रतिनिधित्व हिंदुस्थानच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी अपर्णा सुब्रमणी या करत आहेत. त्या जागतिक बँकेत हिंदुस्थान, बांगलादेश, भुतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंकेच्या प्रभारी आहेत. गेल्या 2 जून रोजी अभयारण्य योजनांवर काऊन्सिलमध्ये चर्चा झाली त्यावेळीही चीनचे प्रतिनिधी झोंगजिंग वांग यांनी आक्षेप घेतला होता.






















































