जानेवारीपासून दररोज दिल्ली ते शांघाय उड्डाण; गलवान खोऱ्यातील 20 जवान शहीदांचा सरकारला पडला विसर

2020 साली गलवान खोऱयात पेट्रोलिंग पॉइंट 14 जवळ हिंदुस्थान आणि चिनी सैन्यात झालेल्या हिंसक झटापटीत हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले. याला प्रत्युत्तर म्हणून केंद्रातील मोदी सरकारने चायनीज ऍप्सवर बंदी घातली, परंतु अवघ्या पाच वर्षांत मोदी सरकारला या घटनेचा विसर पडला असून आता पुन्हा एकदा हिंदी-चिनी भाई-भाई सुरू झाले आहे. चायना ईस्टर्न एअरलाईन्सने नुकतीच घोषणा केली असून दिल्ली ते शांघाय या दोन शहरांमध्ये येत्या 2 जानेवारीपासून दररोज नॉन स्टॉप फ्लाईट सुरू केली जाणार आहे.

दिल्ली ते शांघाय हवाई मार्ग नोव्हेंबर 2025 पासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. या दोन देशांतील उड्डाण याआधी आठवडय़ात केवळ तीन दिवस केले जात होते, परंतु प्रवाशांची संख्या वाढल्याने विमान कंपनीने या मार्गावर दररोज हवाई सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. चाइना ईस्टर्नच्या शेडय़ुलनुसार, फ्लाईट एमयू564 दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी 7.55 ला उड्डाण करेल आणि दुसऱया दिवशी सकाळी 4.10 वाजता शांघायच्या पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले, तर फ्लाइट एमयू 563 शांघायहून दुपारी 12.50 वाजता उड्डाण करेल आणि सायंकाळी 5.45 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचेल. दिल्ली-शांघाय या मार्गासोबत कोलकाता-कुनमिंग मार्गावरील विमानसेवाही सुरू करण्याची तयारी केली जात आहे.