लडाखच्या सीमाभागात तणाव वाढला; चीनने लढाऊ विमानांची गस्त वाढवली

2038

हिंदुस्थान आणि चीनमध्ये महिन्याभरापासून लडाख सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. हा तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये स्थानिक स्तरावर चर्चा झाल्या आहेत. मात्र, त्यातून कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. आता शनिवारी दोन्ही देशांमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चा होणार आहे. या चर्चेपूर्वी सीमाभागात तणाव वाढला असून चीनने लढाऊ विमानांची गस्त वाढवली असून सीमाभागत चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेत हिंदुस्थाननेही सीमाभागात गस्त वाढवली असून लष्कराला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लडाखच्या सीमाभागात, गलवान घाटी आणि अक्साई चीनच्या भागात गेल्या काही दिवसांपासून चीनच्या हवाई हालचाली वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंदुस्थानी लष्कराची चीनच्या हालचालींवर नजर असून सीमाभागत गस्त वाढवण्यात आली आहे. चीनच्या हवाई दलाचा सीमाभागाजवळ युद्धसराव सुरू आहे. त्यांची विमाने सीमेजवळील नो फ्लाय झोनमध्ये आलेली नाहीत. मात्र, या भागात चीन आपल्या हवाई दलाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हिंदुस्थानने सतर्कता दाखवत गस्त वाढवली आहे. लडाखची स्थिती पाहता हिंदुस्थानी लष्कर चीनपेक्षा वरचढ आहे. श्रीनगर आणि चंदीगडच्या हवाई तळाहून हवाई दलाची विमाने इंधन आणि शस्त्रसामग्रीसह अल्पावधीत या भागात दाखल होऊ शकतात. तर चीनचे हवाई तळ उंचावर असल्याने त्यांची विमाने या भागात इंध आणि शस्त्रास्त्रे पोहचवण्यास सक्षम नाहीत.

चीनच्या कोणत्याही कुरघोडींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या 3488 किलोमीटरच्या भागात वास्तविक नियंत्रण रेषेजवळ सैनिकांची संख्या वाढवली आहे. सिक्कीम आणि उत्तराखंडच्या सीमेवर लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. चीननेही सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैनिकांची संख्या वाढवली आहे. महिन्याभरापासून सीमाभागात दोन्ही देशात तणव आहे. तो कमी करण्यासाठी शनिवारी लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चा होणार आहे. त्याआधी चीन हवाई हालचाली वाढवून तणाव निर्माण करत आहे. मात्र, हिंदुस्थानी लष्कर कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करण्यास सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या