चीन उभारणार नाटोसारखी संघटना

नाटोच्या धर्तीवर चीन स्वतःची संघटना उभारणार असून पाकिस्तान या संघटनेत सहभागी होण्याची शक्यता आहे. आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी चीन स्वतःची नाटो संघटना उभारणार असल्याचे चीनचे परराष्ट्रमंत्री ले. युचेंग यांनी म्हटले आहे. चीनच्या नाटोची तुलना अमेरिकेशी होत असून अमेरिकेच्या नाटोमध्ये 32 पैकी 30 देश युरोपातील आहेत. अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठीच चीन नाटोसारखी संघटना उभारण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे समोर आले आहे.

आशियामध्ये अमेरिकेच्या वाढत्या प्रभावामुळे चीन चिंताग्रस्त असून नाटोसारखी नवी संघटना तयार केली तर चीनला अमेरिकेवर दबाव टाकता येणार आहे. नाटो आशिया आणि प्रशांत महासागरात आपले वर्चस्व प्रस्तावित करू पाहत असल्याची चीनला भीती आहे. सध्या चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा पूर्णपणे मोडला आहे. त्यामुळे शी जिनपिंग यांच्याविरोधात चीनच्या लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. हे लक्षात घेऊन शी जिनपिंग नवा अध्याय रचू पाहत असल्याचे समोर आले आहे.

हिंदुस्थानचे टेन्शन वाढणार

चीन लडाखच्या माध्यमातून तर पाकिस्तान जम्मू आणि कश्मीरच्या माध्यमातून आधीच हिंदुस्थानच्या अडचणी वाढवत आहे. त्यात चीनने नाटोसारखी संघटना स्थापन केली तर पाकिस्तानच्या सैन्यदलाची ताकद वाढू शकते. ज्या देशाकडून सुरक्षेची हमी मिळेल अशा देशाच्या सैन्याचा भाग बनण्यासाठी पाकिस्तान आधीपासूनच धडपडत आहे. अशा वेळी चीनकडून प्रस्ताव आल्याने आणि पाकिस्तान त्यात सहभाग घेणार असल्याने हिंदुस्थानचे टेन्शन वाढणार आहे. दरम्यान, लडाखमधील स्थिती पाहता आणि चीनकडून सातत्याने होणारे अतिक्रमण पाहता हिंदुस्थानच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे.