
हिंदुस्थानातील तामीळनाडू येथे फॉक्सकॉन कंपनी आयफोन 17 सीरिजच्या फोनचे उत्पादन करत आहे. ऍपल कंपनी सप्टेंबर महिन्यात आयफोन 17 सीरिज लाँच करण्याची तयारी करत आहे, परंतु त्याआधीच आयफोन 17 च्या उत्पादनाला मोठा ब्रेक लागला आहे. चीनने फॉक्सकॉन कंपनीतील 300 इंजिनीअर आणि टेक्निशियन यांना तत्काळ मायदेशी बोलावले आहे. चीनच्या या तुघलकी निर्णयाचा आयफोन 17 च्या उत्पादनाला फटका बसणार आहे. आतापर्यंत ज्या चिनी इंजिनीअर्सकडून हिंदुस्थानात ट्रेनिंग आणि टेक्निशियनचे हस्तांतरण होत होते, ती प्रक्रिया पूर्णपणे थांबण्याच्या मार्गावर आहे. चीनच्या या निर्णयानंतर फॉक्सकॉन कंपनी आता व्हिएतनाममधून इंजिनीअर आणण्याचा विचार करत आहे. तसेच हिंदुस्थानात 1 हजार स्थानिक कर्मचाऱ्यांची नवीन भरती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या निर्णयामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांची संख्या 40 हजारांपर्यंत पोहोचवण्यात येणार होती, परंतु आता ही प्रक्रिया थंड होण्याच्या मार्गावर आहे. चीनच्या या निर्णयावर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, चीनने इंजिनीअर माघारी बोलावण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे फोन निर्मिती करण्यास फार अडचण येणार नाही.