चीनने हिंदुस्थानच्या 10 जवानांची सुटका का केली? हे आहे कारण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी पूर्व लडाख सीमेजवळ गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात 20 जवान शहीद झाले. हिंदुस्थानी जवानांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात चीनचे 43 जवान ठार झाले. चीनने युद्धाचीच ठिणगी टाकली असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) प्रचंड तणाव आहे. दरम्यान, चीनच्या तावडीत असलेल्या आपल्या दोन मेजरसह 10 जवानांची चर्चेनंतर सुटका झाल्याचे वृत्त आहे. पण, चीनने जवानांची सुटका का केली, याचं कारण एक प्रोटोकॉल असल्याची माहिती मिळत आहे.

सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात हिंदुस्थानचे 20 बहादूर जवान शहीद झाले. यावेळी चिनी सैन्याने 10 जवानांना पकडले होते. या जवानांच्या सुटकेसाठी तीन दिवस लष्करी पातळीवर चर्चा झाली. अखेर गुरुवारी 2 मेजर, 2 कॅप्टन आणि 6 जवान यांची चीनच्या तावडीतून सुटका झाली. परतलेल्या सैनिकांसोबत कोणतीही गैरवर्तणूक झाली नसल्याचीही माहिती मिळत आहे.

चीनच्या वर्तणुकीमागे दयाबुद्धी नसून तो एक नियम अथवा प्रोटोकॉल आहे. सीमा भागात पहारा देण्यासाठीचे काही प्रोटोकॉल्स नेमून देण्यात आले आहेत. त्यानुसार, जर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक जर संघर्ष झाला आणि त्या दरम्यान शत्रु राष्ट्राचे सैनिक आपल्या सीमेत आले तर त्यांना लवकरात लवकर परत केलं जावं, असा नियम आहे. 2013मध्येही चुमार येथे एक चिनी सैन्य अधिकारी खडकावरून पडून हिंदुस्थानी सीमेत आला होता. त्यादरम्यान हिंदुस्थानी सैन्याने त्याचा जीव वाचवला आणि दुसऱ्या दिवशी त्याला चीनकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. याच नियमानुसार चीनने हिंदुस्थानी जवानांची सुटका केली आहे.

दुसरीकडे, सोमवारच्या घटनेनंतर चीनबरोबरचा तणाव आणखी वाढला असून, कोणत्याही ‘ऑपरेशन’साठी सज्ज राहण्याची तयारी हिंदुस्थानने केली आहे. हवाई दलाच्या फायटर जेट विमानांनी सीमेजवळ लेहमध्ये घिरटय़ा घातल्या. लेह-लडाख, श्रीनगर येथे मोक्याच्या ठिकाणी फायटर बेस येथे जग्वॉर, सुखोई, मिराज हे लढाऊ विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत. लेख, श्रीनगर एअरबेसप्रमाणेच अवंतीपुर, बरेली, अदमपूर, अंबाला, हालवारा, सिरसा एअरबेसवरही लढाऊ विमाने सज्ज आहेत. ‘ऑपरेशन’ची वेळ आलीच तर या एअरबेसवरून लढाऊ विमाने उड्डाणे घेतील.