
अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यामुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये आल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी चीनने आधीच दिली होती. या घटनांमुळे प्रश्न पडला आहे की नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये आल्याने चीनला राग येण्याचं काय कारण आहे? याचं कारण इतिहासाता दडलेलं आहे. 1989 साली चिनी सरकारने बीजिंगमध्ये सरकारविरोधात करण्यात आलेलं आंदोलन चिरडण्यात आलं होतं. या आंदोलनाच्या 2 वर्षांनंतर म्हणजेच 1991 मध्ये नॅन्सी पेलोसी तियानमेन स्क्वेअर इथे गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या निदर्शकांच्या समर्थनार्थ बॅनर फडकावला होता. इथूनच चीनविरूद्ध पेलोसी संघर्षाला सुरुवात झाली होती. चीनने सातत्याने नॅन्सी पेलोसी यांच्यावर त्या खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. चीनने तैवानवर कब्जा मिळवण्याची वारंवार धमकी दिली आहे. त्यासाठी वेळ पडल्यास बळाचा वापरही करू असं चीनने जाहीरपणे सांगितलं आहे.
नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीच्या योजनांवर केवळ चर्चा झाली होती, परंतु त्याबाबत औपचारिकपणे पुष्टी देण्यात आली नव्हती. अमेरिकन काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या शिष्टमंडळासह नॅन्सी पेलोसी सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियाला पोहोचल्या होत्या. मंगळवारी रात्री नॅन्सी पेलोसी यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ तैवानला पोहोचले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नॅन्सी पेलोसी यांच्या या तैवान दौऱ्याला पाठिंबा दिला नसल्याचे सांगितले जात आहे. पेलोसी यांना तैवानमध्ये येऊ नका असं धमकावल्यानंतरही त्या तैवान दौऱ्यावर आल्याने चीन संतापला आहे. पेलोसी यांना रोखण्याची जबाबदारी ही बायडेन यांची होती असं चीनचं म्हणणं आहे. असून पेलोसी यांना रोखण्याची जबाबदारी बायडेन यांची होती, असे म्हटले आहे. व्हाईट हाऊसने पेलोसींना रोखण्याचा प्रयत्नही केला होता. काही दिवसांपूर्वी जो बायडेन यांनी हे चांगलं होणार नाही असं सैन्याने सांगितल्याचं म्हटलं होतं.
बीजिंगमधील तियानमेन स्क्वेअरवर कम्युनिस्ट पक्षाने ज्या प्रकारे आंदोलन चिरडले होते, त्यावरून पेलोसी यांचा चीनवर राग आहे. नॅन्सी पेलोसी यांनी 1991 मध्ये तियानमेनला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी एक फलक फडकावला होता. या फलकावर ‘ज्यांनी चीनमधील लोकशाहीसाठी आपले प्राण दिले त्यांच्यासाठी’ असा संदेश लिहिला होता. पेलोसी यांनी फलक फडकावल्याचे पाहताच तिथे पोलीस पोहोचले होते. त्यांनी घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पकडले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पेलोसींचा निषेध केला होता आणि हे सगळं पूर्वनियोजित होतं असा आरोप केला होता. पेलोसींच्या या आंदोलनावर अनेकांनी टीका केली होती.
पेलोसी यांनी तियानमेन चौकात झालेल्या हिंसाचाराच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त एक निवेदन जारी केले. त्यांनी त्या निषेधाचे वर्णन राजकीय धैर्याचे सर्वात मोठं उदाहरण असे केले होते. या निवेदनात त्यांनी चीनमधील कम्युनिस्ट राजवट ही जुलमी असल्याचेही म्हटले होते. 2002 मध्ये चीनचे तत्कालीन उपराष्ट्रपती हू जिंताओ यांच्यासोबतच्या भेटीत पेलोसी यांनी त्यांना चार पत्रे देण्याचा प्रयत्न केला होता. या पत्रांमध्ये चीन आणि तिबेटमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती आणि त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, हू जिंताओ यांनी ही पत्रे स्वीकारली नव्हती. सात वर्षांनी पेलोसी यांनी जिंताओ यांना पुन्हा पत्र पाठवलं होतं. यावेळी जिंताओ हे चीनचे राष्ट्रपती झाले होते. या पत्रात पेलोसी यांनी लिऊ शिओबो यांच्यासह राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. 2010 मध्ये, लिऊ यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते, मात्र पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना नॉर्वेला जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.
पेलोसी यांनी चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा कारण देत चीनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यास सातत्याने विरोध केला आहे. पेलोसी यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांना 2008 च्या उन्हाळी ऑलिंपिकच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. मात्र बुश यांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले होते. या वर्षीही पेलोसी यांनी बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिकवर राजनयिकांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन केले होते. चीनमध्ये नरसंहार सुरू असताना जगभरातील राष्ट्रप्रमुख तिथे जातील अशा स्थितीत तुम्हाला मानवी हक्कांवर बोलण्याचा अधिकार नाही असे पेलोसी यांनी म्हटलं होतं.
































































