
चीनमध्ये कोरोनाच्या ऑमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव झपाट्याने होत असल्याने तेथील सरकारने देशभरात कडक लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी देशात जिरो कोविड पॉलिसी अवलंबली जात असून कोरोना रोखण्यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू केले असून नागरिकांना घराबाहेर पडण्यासही मनाई केली आहे. कोरोनाची लक्षण असलेल्यांना एकतर एका खोलीत कोंडले जात आहे किंवा सरकारने तयार केलेल्या लोखंडी बॉक्समध्ये ठेवले जात आहे. सरकार लहान मुलं, वृद्ध, गरोदर स्त्रीया यांच्यावर देखील दया दाखवत नाहीए.
चीन सरकारच्या कठोर नियमांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक नागरिक यावरून चीन सरकारवर टीका करत आहेत. चीनमध्ये सध्या नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने घरात साठा करून ठेवलेल्या अन्नधान्यावर भागवावं लागत आहे. अनेक नागरिक अन्नधान्य वाचविण्यासाठी रात्रीचं जेवणं टाळत आहेत. त्यासाठी दुपारीच तीन ते चार वाजता झोपी जात आहेत. जास्तीत जास्त वेळ झोपल्याने संध्याकाळचा नाश्ता व रात्रीच्या जेवणासाठी लागणारे साहित्य शिल्लक राहते.
‘मला गेल्या दोन वर्षात एकदाही कोरोना झालेला नाही. तरी मला सरकारने 21 दिवस घरात बंद राहण्यास सांगितले आहे. सुरुवातीला मी स्वत:चे सांत्वन करत होते. मात्र आता मी निराश झाले आहे. सैरभर झाले आहे. माझ्याकडे फक्त न्यूडल्सचे काही पॅकेट, पाच किलो पीठ, थोडे तांदूळ व थोडे मांस उरले आहे. यात मी माझ्या पूर्ण कुटुंबाचं पोट फक्त सात दिवस भरू शकते. त्यापुढे मी काय करावे? म्हणून आता आम्ही एकच वेळ जेवतो व लवकरात लवकर झोपून जातो. दुपारीच झोपलो की रात्रीच्या जेवणाची चिंता राहत नाही.’, असे शिआन प्रांतातील एका महिलेने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.




























































