चिपी विमानतळाच्या तांत्रिक कामास 31 डिसेंबरची डेडलाइन, उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मंत्रालय येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या खास बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी एअरपोर्टबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या विमानतळाचे तांत्रिक काम 31 डिसेंबर 2020 रोजीपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आय.आर.बी. कंपनीने दिले आहे. त्यामुळे हे विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना संसद गटनेते तथा खासदार विनायक राऊत यांनी दिली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या मागणीनुसार ना.सुभाष देसाई यांनी गुरुवारी मंत्रालय येथे एमआयडीसी, आयआरबी, एमएसईबी व बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविली होती.

या बैठकीत चिपी विमानतळावर वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा झाली. ना. देसाई यांनी आदेश दिल्याप्रमाणे आयआरबीचे वरिष्ठ अधिकारी सुधीर हौसिंग यांनी 31 डिसेंबर 2020 रोजीपर्यंत सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून 20 जानेवारी 2021 पर्यंत डीजीसीएकडून परवाना मिळविला जाईल असे आश्वासन दिले.