
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आणि चिपळूण तालुका कबड्डी संघटना व चिपळूण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 67 वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत चिपळूण येथील पवन तलाव मैदान, इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे. सदर स्पर्धेतून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुरुष व महिला संघ निवडला जाणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला संलग्न असणाऱया 25 जिह्यांचे पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहेत. पुरुषांमध्ये मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिह्यांमध्ये चुरस रंगणार आहे. पंकज मोहिते, नीलेश शिंदे, विकास काळे, अक्षय जाधव, गिरीश इरनाक, अजिंक्य पवार, सुनील दुबिले, कृष्णा मदने, तुषार पाटील हे प्रो-कबड्डीमध्ये खेळलेले कबड्डीपटू या स्पर्धेचे आकर्षण असणार आहे. पुरुषांमध्ये गतवर्षी रायगड जिल्हा संघाने अजिंक्यपद पटकावले होते.
महिला विभागातून पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या संघांमध्ये तुल्यबळ लढती होतील. महिला संघातून पूजा यादव, अंकिता जगताप, पूजा शेलार, कोमल देवकर, श्रद्धा पवार, सोनाली हेळवी यांच्यासह ज्युनियर होतकरू मुली सहभागी होणार आहेत.



























































