दुरुस्त केलेला रस्ता उखडला, वाहनचालकांना ठरतोय डोकेदुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्हावा शेवा येथील कळंबुसरे,मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील चिरनेर – कोप्रोली हा दुरुस्त करण्यात आलेला रस्ता पाईप लाईन टाकण्याच्या कामासाठी उखडल्याने या रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.एकंदरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केलेला रस्ता पुन्हा उखडल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकांना हा रस्ता डोकेदुखी ठरत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतू कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतील पाईप लाईन टाकण्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मोठी जुई, कळंबुसरे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या मधोमध सदर रस्त्याचे खोदकाम सुरू केले.यावेळी संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्त करण्यात येणार असे अभिवचन या परिसरातील नागरिकांना दिले होते.

परंतु पावसाळा संपायला आला असतानाही संबंधित ठेकेदाराने किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही.त्यामूळे सध्या सदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.रात्री हा उखडलेला रस्ता वाहन चालकांना दिसून येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदलेल्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी येथील नागरिक, वाहन चालक करीत आहेत.